आष्ट्यात लहरी हवामानामुळे नागरिक गारठले

आष्टा शहर आज धुक्यात न्हाले. मध्यरात्रीपासून सकाळी दहापर्यंत शहरावर धुक्याचे वास्तव्य, आभाळाचे सावट, अन बोचऱ्या थंडीची मोहर असे वातावरण होते. अचानक बदललेल्या वातावरणाने आष्टेकर नागरिक गारठून गेले होते. शहराची पहाट, पहाटेतील वाट आज धुक्यात हरवल्या. आष्टा सांगली महामार्ग रोडवरील वाहतूक कासवगतीने सुरु होती. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अडथळा धोकादायक ठरत होता. सर्वच वाहने डिप्परच्या प्रकाश झोतात एकमेकांना सिग्रल देत होते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने गर्द दाट धुक्यातून जाणारी शाळकरी मुले जीव मुठीत घेऊन वाट शोधित शाळा, महाविद्यालय जवळ करीत होती.

क्लासला जाणान्या सायकलीवरील मुले, सायकल चालवण्यापेक्षा हातात पकडून पायी जाणे पसंद करीत होती. वेळेत शाळेत पोहचण्यासाठी शिक्षकांचा वेग मात्र कायम होता. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना आज योगा प्राणायमाला मुरड घालावी लागली. त्यातूनही मैदानावरील क्रिकेटप्रेमींनी मात्र, चौकार,षटकारांची टोलेबाजी केली. ऊसतोड मजूर धुक्याच्या शिडकावात ऊसतोडणीत व्यस्त होते.आजचे धुके, अंकुर फुटत असणाऱ्या गहू, पावटा, पालेभाज्या पिकासाठी घातक होते. आरोग्यासाठी घातक धुक्यामुळे सकाळी अकरापर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते.