आष्टा येथील प्राणीप्रेमींनी पंधरा फूट खोल कॅनॉलमध्ये पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने वरती काढून जीवदान दिले. बघ्यांची गर्दी, गर्दीतील आरडाओरड, मोकाट बैल, त्याचे सुटलेले नियंत्रण, अन् प्राणी मित्रांचे दोर सापळे तब्बल तीन तासाच्या कसरतीनंतर सुटकेचा श्वास सुटला. सोमलिंग तलाव ते कदम वेस असा दोन किमी लांबीचा सुमारे पंधरा फूट खोलीचा कॅनॉल नगरपालिकेने बांधला आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गाई व बैलांची संख्या मोठी आहे. हे कळप ग्रामदैवत चौंडेश्वरी देवीचे असल्याचे बोलले जाते. आज या कळपातील एक वळू बैल कदमवेस येथील पंधरा फूट खोल कॅनॉल मध्ये पडला.
नागरिकांनी ही माहिती प्राणी मित्र पिंटू मोरे यांना दिली. लागलीच पिंटू मोरे, संदीप गायकवाड, विक्रम कटारे, विशाल थोटे, समेद मलगावे, सचिन मोरे, कुमार शिंदे, अंकुश मदने, स्वराज हाबळे, राज वारे प्रथमेश कांबळे, अनिरुद्ध खाडे, विकी सावंत हे घटनास्थळी आले. कॅनॉलमधून वरती यायला मिळत नसल्याने बैलाचे स्वतः वरील नियंत्रण सुटले होते. बैल आक्रमक झाला होता. यावेळी जेसीबीने वरती काढण्याचे ठरले. अंकुश मदने यांनी स्वतःचा जेसीबी उपलब्ध करून दिला. धाडशी प्राणी मित्रांनी चार दोर बैलाभोवती लपेटून जेसीबीच्या सहाय्याने वरती काढले तशी बैलाने धूम ठोकली. प्राणी मित्रांच्या टीमचे कौतुक होत आहे.