वारणेत रंगणार आज कुस्तीचा महासंग्राम!

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २९ व्या पुण्यस्मरणार्थ बुधवारी (ता. १३) वारणानगर येथे भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम होत आहे. या मैदानाची तयारी पूर्ण झाली असून, वारणानगरी कुस्ती शौकिनांसाठी सज्ज आहे. दरम्यान, आमदार डॉ. विनय कोरे यांनी आज रात्री मैदानाची पाहणी केली.


वारणा विद्यालयाच्या पटांगणावर खास कुस्ती मैदान तयार असून दुपारी एकपासून आंतरराष्ट्रीय विश्वनाथ शक्ती श्री कुस्ती मैदानास प्रारंभ होईल. देशातील नामवंत मल्ल येणार आहेत. “शक्ती श्री” किताबाच्या कुस्त्यांसह ३५ पुरस्कृत कुस्त्यांसह २०० हून अधिक कुस्त्या होतील. मैदान पाहणी वेळी प्रा. जीवनकुमार शिंदे, वारणा कुस्ती केंद्राचे संदीप पाटील आदी उपस्थित होते.

प्रमुख लढती अशा महाराष्ट्र
केसरी सिकंदर शेख (गंगावेश, कोल्हापूर) विरुद्ध मोनू दहिया (दिल्ली), हर्षद सदगीर (पुणे) विरुद्ध अहमद मिर्झा (इराण), पृथ्वीराज पाटील (देवठाणे, कोल्हापूर) विरुद्ध लाली मांड (पंजाब), माऊली कोकाटे (पुणे) विरुद्ध भीम (धूमछडी- पंजाब) प्रकाश बनकर (गंगावेश) विरूद्ध अभिनयक सिंग (दिल्ली), दादा शेळके (पुणे) विरूद्ध पालिंदर (मथुरा), कार्तिक काटे (कर्नाटक) विरुद्ध जितेंद्र त्रिपुडी (हरियाणा), सुबोध पाटील (सांगली) विरुद्ध संदीप कुमार (दिल्ली), सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) विरुद्ध रिजा (इराण), कालीचरण सोलणकर (गंगावेश) विरुद्ध देव नरेला (दिल्ली), नामदेव केसरे (वारणा) विरुद्ध रवी कुमार (हरियाना)

वारणा कापशी येथील उपमहाराष्ट्र केसरी मल्ल पै. महिपती बाबूराव ही पुरस्कारासाठी निवड केली.
त्यांना कुस्ती मैदानात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. केसरे यांचे वारणा कापशी गाव. सध्या त्यांचे वय ऐंशी. पै. गणपतराव आंदळकर, ऑलिंपिकवीर पै. बंडा पाटील रेठरेकर, पै. महिपती केसरे या तत्कालीन मल्लांनी वारणा खोरा भारतीय कुस्ती क्षेत्राच्या शिखरावर पोहोचवला होता.

पै. केसरे यांनी कारकिर्दीत सात वेळा महाराष्ट्र चॅम्पियन, दोनदा ऑल इंडिया पदक, एकवेळ उपमहाराष्ट्र केसरी अशा मानाच्या गदा पटकावल्या आहेत. पंजाबच्या पतियाळा येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या मैदानात ८५ किलो गटात त्यांनी दिल्लीचा मल्ल पै. सतपाल बरोबर तोडीस तोड लढत दिली होती. थोडक्या गुण फरकाने त्यांनी ही लढत गमावली होती.