कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय; गेल्या काही दिवसांत केसेसमध्ये वाढ

गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस डोकं वर काढताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या एक्टिव्ह केसेसमध्ये वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या एक्टिव्ह केसेसची संख्या 1013 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये दररोज 100 पेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहेत. 

नुकतंच झालेल्या एका संशोधनानुसार, एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. यानुसार, कोरोनाचा व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या फुफ्फुसात सुमारे दोन वर्षे राहू शकतो. नेचर इम्युनोलॉजी जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वैद्यकीय अभ्यासातून हा दावा समोर आला आहे.या अभ्यासानुसार, SARS CoV-2, कोविड-19 ला कारणीभूत असलेला व्हायरल काही लोकांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्यानंतर 18 ते 24 महिने टिकून राहू शकतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात रविवारी 166 नवीन कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेली. यामध्ये एकूण एक्टिव्ह रूग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली. केरळमध्ये सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. ANI च्या मते, अलीकडील दैनंदिन सरासरी सुमारे 100 प्रकरणं नोंदवली जातायत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याचा संबंध थंडीच्या वातावरणाशी आहे. यावेळी इन्फ्लूएंझा सारखे आजार वाढू लागतात. या वर्षी जुलैमध्ये कोविड-19 सुरू झाल्यापासून एक दिवसातील सर्वात कमी प्रकरणांची संख्या 24 होती.

भारतातील एकूण कोविड-19 ची संख्या 4.44 कोटी आहे. मृतांची संख्या 5,33,306 आहे, परिणामी मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. देशाने कोविड-19 लसींचे 220.67 कोटी डोस दिले आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य अधिकारी लसीकरणाच्या महत्त्वावर भर देतायत.

सिंगापूरमधील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता वाढलीये. आरोग्य मंत्रालयाने, या आठवड्यात सर्वांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या ठिकाणी कोविड -19 संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे सिंगापूरच्या रुग्णालयांवर दबाव येतोय.