पाच वर्षांपूर्वी हातकणंगले ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आलं. पण या पाच वर्षांच्या काळात बहुतांश नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यात तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि नगरसेवकांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात येते. त्यासंबंधी काहींनी लेखी तक्रारी करूनही त्यावर मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
हातकणंगलेमधील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी राबविण्यात आलेल्या पाणी योजनेमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या योजनेसाठीच्या सर्व प्रशासकीय मंजुरी घेऊन समाजकल्याण विभागाने हातकणंगले नगरपंचायतकडे 51 लाख रुपयांचा निधी वर्ग केला. त्याच्यासंबंधी टेंडर आणि इतर सर्व प्रक्रिया या नगरपंचायतीने राबवल्याचं समाजकल्याण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं. तर या कामात नगरपंचायतीने मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ल्याचा आरोप आता नागरिकांनी केला.
नगरपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाल संपण्यासाठी आता काहीच दिवसांचा अवधी उरला आहे. पण या पाच वर्षांच्या काळात नगरपंचायतीने काय ठोस काम केलं याचा अहवाल जनतेसमोर मांडावा अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
