सांगलीत नववर्षाच्या स्वागतासाठी पोलिस यंत्रणा सज्ज 

सरत्या वर्षाला बाय बाय करून नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सांगलीनगरी सज्ज झाली आहे. या जल्लोषात कोणतीही अनुचित घटना घडू नये, बेकायदा दारूची विक्री तसेच विनापरवानगी दारूपाचे आयोजन होऊ नये यासाठी पोलिस यंत्रणेसह राज्य उत्पादन शुल्क विभागही सज्ज झाला आहे. सुरक्षेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मद्यपी वाहनचालकावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. नववर्षाच्या स्वागताला चार दिवस उरले आहेत. या निमित्ताने शहरातील व्यवसायिकांनी खास तयारी केली आहे. विविध हॉटेलमध्ये खास रोषणाईही करण्यात आली असून, संगीतमय पार्टीचे आयोजनही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे.

जिल्ह्यात अघटित घटना होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील पोलिस दक्षता घेत आहेत. यंदा पहाटे पाच वाजेपर्यंत जल्लोष साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर वाईनशॉप रात्री एकवाजेपर्यंत खुले राहतील. एक दिवसाच्या परवान्यासह वर्षिक परवान्यांचेही वितरण करण्यात आले असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. त्यात मद्यप्राशन करून वेगवान ड्रायव्हिंग करणे, दारूच्या नशेत मारामाऱ्या, भांडणे असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रोखण्यासाठी गुन्हे शाखा, सायबर, आर्थिक गुन्हे शाखा तसेच विशेष पथकासह स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी खास लक्ष ठेवणार आहेत. शहरात गस्ती पथकेही नियुक्त करण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर व मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिला.