कारखानदारांचा ३२०० चाच कित्ता; ऊस उत्पादक अडचणीत

गेल्या काही वर्षापूर्वी कारखानदारांमध्ये दरासाठी स्पर्धा असायची. मात्र या हंगामात कारखानदारांनी ४ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत जादा दर देऊन उत्पादकांची चेष्टा केली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी प्रतिटन ३२०० रुपयांचाच कित्ता गिरवला आहे. उसाचा एकरी उत्पादन खर्च एक लाखाच्या पुढे गेला असताना कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याची चर्चा आहे. वाळवा तालुक्यात ऊसतोड हंगामाने गती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, सातारा जिल्ह्यातील कृष्णा, सांगली जिल्ह्यातील राजारामबापू, विश्वास, हुतात्मा, दत्त इंडिया, डालमिया आदी कारखान्यांकडे ऊस पाठवला जात आहे. तोडणी मशिनमुळे हंगामाला गती आली आहे. त्यामुळे हंगाम लवकरच संपणार असल्याची चिन्हे आहेत.

जादा ऊस नेण्यासाठी कारखान्यांत स्पर्धा आहे. परिणामी कारखान्यांवर वाहने लवकर खाली होत नसल्याचे चित्र आहे. साखरेच्या चढ्या भावाचा फायदा ऊस उत्पादकांना का नाही? साखर निर्यात बंदीचा फटका साखर उद्योगाला बसत आहे. त्यामुळे साखरेचे भाव आता कमी झाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जादा दराचे घोडे अडले आहे. दुसऱ्या बाजूला साखर बाजारात भाव ४० ते ४२ च्या घरात असताना ऊस उत्पादकांना त्याचा फायदा का दिला जात नाही? गत हंगामातील उसाला ज्या कारखान्यांनी ३००० पर्यंत दर दिला आहे त्यांनी प्रतिटन १०० व ३००० पेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये देण्याचे कबूल केले होते; मात्र आजअखेर कोणी फरक दिला नाही. उसाच्या उपपदार्थाची बाजारात चलती असताना त्याच्या फायद्यातील उत्पादकांना फुटकी कवडीही दिली जात नसल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. दर देताना मात्र कारखानदार एकच कित्ता गिरवत आहेत. ऊस आंदोलनाची धारही बोथट झाली आहे.

जाहीर केलेला पहिला हप्ता ..
राजारामबापू कारखाना ३२०० रुपये (दिवाळीला ७५ रुपये), वारणा ३२२०, कृष्णा (शिवनगर) – ३२०० विश्वास (चिखली)- ३२२५ हुतात्मा (वाळवा) ३२०४, डालमिया (आरळा) ३२०० क्रांती (कुंडल) – ३२००, सोनहिरा ३२०० (वांगी), दत्त इंडिया (सांगली) – ३१५०.