उपमुख्यमंत्री पवार उद्या जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात!

पक्ष कार्यालयाचे उद्धाटन करण्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूरमध्ये सोमवार दि. ५ फेब्रुवारी रोजी येत आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांची राजकीय कोंडी करण्याचे निश्‍चित केल्याचे यावरून दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा गट स्थापन करून अजित पवार थेट सरकारमध्ये सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार पाटील यांनी खा. शरद पवार यांच्यासोबत राहून या गटाची धुरा सांभाळली असताना त्यांचे महत्वाचे साथीदार अजितदादा गटात सामील झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील चार माजी महापौरासह काही माजी नगरसेवकही दादा गटात सहभागी झाले आहेत, तर काही माजी नगरसेवक या वाटेवर आहेत.

या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार दि. ५ फेब्रुवारी रोजी सांगली दौर्‍यावर पहिल्यांदाच येत आहेत. जिल्ह्यात आगमन होताच इस्लामपूरमध्ये केदार पाटील यांच्या प्रस्तावित राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने आमदार पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा हेतू असल्याचे मानले जात आहे.उपमुख्यमंत्री पवार इस्लामपूरमध्ये कार्यालय उद्घाटन झाल्यानंतर विटा येथे स्व. अनिल बाबर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार असून विट्यात ते पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. यानंतर सायंकाळी सांगलीमध्ये पुरूष कबड्डी निवड चाचणी स्पर्धेला भेट देउन कुपवाडमध्ये खो-खो स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.