११ तास विद्युत पुरवठा बंद! जनजीवन विस्कळीत….

सांगोला व मंगळवेढा तालुक्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या मेन लाईन ब्रेकरचा अधून मधून खोळंबा होत असल्यामुळे तालुक्याचा यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित होत होता. यामुळे त्याच्या दुरुस्तीकरता काल बुधवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी ते रात्री नऊ वाजेपर्यंत संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला होता.

तब्बल अकरा तास वीज गायब झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे काम जागेवरच थांबल्याचे चित्र दिसून आले. तसेच इंटरनेट सेवा देखील ठप्प झाली. शहर आणि तालुक्यातील नागरिकांची अनेक कामे खोळंबली. त्यामुळे प्रत्येक जण हा लाईट कधी येणार याची प्रतीक्षा करीत होता. पंढरपूर येथून मेन लाईनचे देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण होताच रात्री उशिरा तालुक्याला विद्युत पुरवठा सुरळीत सुरू झाला.