आजकाल चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या चोऱ्या उघडकीस आणण्याचे पोलिंसांसमोर आव्हान देखील आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याभरात टेम्पो, चारचाकी, दुचाकी चोरून कर्नाटकात विकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला.दुचाकी, चारचाकी चोरीचे ९० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या नागेश हणमंत शिंदे (वय ३०, रा. कोरोची, हातकणंगले) याच्यासह पाच जणांना अटक केली आणि १२ गुन्हे उघडकीस आणले. आतापर्यंत सात चारचाकी, पाच दुचाकी, असा सुमारे ६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आणखीन दोन वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणांहून नागेश शिंदे व त्याचा साथीदार संतोष बाबासाहेब देटके (वय ४०, रा. तारळे, पाटण, सातारा) यांनी दुचाकी, चारचाकी चोरल्या असून त्यातील एक वाहन घेऊन सरनोबतवाडी परिसरात आल्याची माहिती अंमलदार राम कोळी व सुरेश पाटील यांना मिळाली.या परिसरात सापळा रचून संशयित शिंदे व देटकेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत शिरोली एमआयडीसीमधून टेम्पो चोरल्याचे समोर आले. दोघांच्या चौकशीत कुरूंदवाड, इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, शाहूपुरी, राजारामपुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच दुचाकी, तीन टेम्पो, चारचाकी चार वाहने चोरल्याचे स्पष्ट झाले.