बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सैफअली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाली आहे. चोराने सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचे समजते. त्याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची खोल जखम झाली आहे. तर धारदार पाते त्याच्या पाठीत रुतून राहिले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचे समजते. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या बारामती येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात रात्री अडीचच्या सुमारास चोर शिरल्याचे लक्षात आले.
घरातील नोकरांशी चोराचा वाद सुरु होता. त्यावेळी सैफ अली खान तिकडे आला. त्याची चोराशी झटापट झाली. यावेळी चोराने धारदार शस्त्राने सैफ अली खानवर वार केले. यामध्ये सैफच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर दुखापत झाली आहे. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.