Rain Alert : ऐन थंडीत पाऊस झोडणार, पुढील ४ दिवस ३ राज्यांत मुसळधार कोसळणार

बंगालच्या खाडीत पुढील ३६ तासांत नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ या तीन राज्यांत १२ ते १५ नोव्हेंबर म्हणजेच चार दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने ही माहिती दिली.

मागील २४ तासांत तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांत तुफान पाऊस कोसळला. तर पंजाब, हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी प्रचंड धुके पसरले होते.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ येथे ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच तमिळनाडूमध्ये ९ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत, केरळ आणि माहे येथे १३ ते १३ नोव्हेंबर, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, यनम, रायलसीमामध्ये १२ आणि १३ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस कोसळेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच यासंबंधी सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशमध्ये १० ते १२ नोव्हेंबर आणि उत्तर – पश्चिम पंजाबमध्ये १० आणि ११ नोव्हेंबरला दाट धुक्याची शक्यता आहे.जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरातमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सियसने वाढलेले आहे. उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील हिंडनमध्ये १३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

तेलंगणातील बहुतांश ठिकाणी १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. हवामान विभागाने शनिवारी ही माहिती दिली. याच कालावधीत राज्याच्या वेगवेगळ्या भागात ढगांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.