माजी आमदार दिपकआबा भाजपवासी होणार, चर्चांना उधाण….

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन त्यांची आमदारपदी निवड झाली. त्यांनी पदभार देखील स्वीकारून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न देखील करीत आहेत. विधानसभा निवडणुकीची तसेच त्यानंतर लागलेल्या निकालाची चर्चा सर्वत्र होती. त्याच्या सध्या चर्चा थांबलेल्या आहेत. जो तो आपापल्या कामांमध्ये लागलेला आहे. परंतु जेव्हा राजकारणाचा विषय निघेल त्यावेळेस अनेक चर्चांना उधाण येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी घेतली.

सांगोला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढता लढता तत्कालीन आमदार शहाजीबापूंच्या पराभवाला कारणीभूत ठरलेले आणि विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदारकी मिळवून देण्यात नकळत हातभार लावणारे विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आता उद्धव ठाकरे यांची मशाल टाकून केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचे कमळ हाती घेत ते भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांना सध्या सांगोल्याच्या चौकाचौकात मोठ्या रंगतदार चर्चांनी उधान आलेले आहे.

दीपकआबांच्या उमेदवारीमुळे झालेल्या तिरंगी लढतीचा फटका बसून शहाजीबापूंना माजी आमदार म्हणून बसावे लागले आहे. या सर्व राजकीय गदारोळामध्ये दीपकआबा मात्र राजकीय पुनर्वसनासाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागलेले आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत ठाण मांडून कधी मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस तर कधी नाम. शिवेंद्रराजे भोसले, नाम. चंद्रकांतदादा, नाम. जयकुमार गोरे अशा भाजपच्या अनेक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे माजी आमदार दीपकआबा भाजपवासी होणार या चर्चांना ऊत आलेला आहे