लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका कधी होतील, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या आहेत. त्यामुळे नगरपालिका व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाबाबत उत्सुकता असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
भाजपच्या राज्यस्तरीय शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. नगरपालिका व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या आहेत. याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु असून 21 जानेवारीला होत असलेल्या सुनावणीत या प्रकरणाचा निकाल लागेल.
दरम्यान, सुनावणीत निकाल लागला तर येत्या दोन ते तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतील, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाधिकऱ्यांना केले.