ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अवघ्या ४८ तासांत अटक, साडेतीन लाख रुपयांची वाहने जप्त

अनेक भागात चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या चोरी होत असल्याने भीतीच वातावरण आहे. वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड गावच्या हद्दीत असणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या गाडीतळावरून ट्रॅक्टरची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना अवघ्या ४८ तासांत तुजारपूर फाट्याजवळ अटक करत पोलिसांनी ट्रॅक्टरसह एक मोटार अशी साडेतीन लाख रुपयांची वाहने जप्त केली.

ही कारवाई मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाली.शंकर ज्ञानेश्वर ठाकरे (वय ३५, रा. येरड बाजार, अमरावती, सध्या रा. वेणीकुटा, जि. यवतमाळ) आणि लहू मधुकर उगलमुगले (वय ४१, रा. नारेवाडी- केज, जि. बीड) अशी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुंदर काशिनाथ बाबर (रा. बालेपीरनगर, जि. बीड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.

ट्रॅक्टर चोरीच्या या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत चोरट्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक मेगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय हारुगडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कामगिरी सोपविली होती.

पथक गस्त घालत असताना गाडीतळावरून चोरलेला ट्रॅक्टर घेऊन दोन चोरटे तुजारपूरकडे येत असल्याची माहिती मिळाल्‍यानुसार हारुगडे यांनी सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचा चोरलेला ट्रॅक्टर आणि चोरीसाठी वापरलेली २ लाख ५० हजार रुपये किमतीची मोटार हस्तगत केली आहे.