ठाणापुडे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत शांतीनगर येथे वारणा कालव्यामध्ये रविवारी सकाळी ग्रामस्थांना मगरीची दोन पिल्ले आढळली. नदीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर मगरीची पिल्ले आढळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ठाणापुडे ते करजंवडे या मुख्य मार्गावर लादेवाडी ते चिकुर्डेपर्यंत वारणा कालवा आहे. पावसामुळे हा कालवा पाण्याने भरलेला आहे.
आज सकाळी येथील प्रमोद पाटील व अजिंक्य पाटील हे काही कामानिमित्त कालव्याकडे गेले असता त्यांना कालव्यामध्ये दोन मगरीची पिल्ले दिसली.सध्या वारणा नदीला पूर आल्यामुळे पुराचे पाणी बॅक वॉटरद्वारे कालव्यामध्ये मिसळले आहे. या कालव्यामध्ये दोन मगरीच्या पिल्ला व्यतिरिक्त मोठी मगरी असू शकते. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.पाण्यामधूनच नदीतील मगरीची पिल्ले कालव्यात आल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. या कालव्याशेजारी मुख्य रस्ता तसेच अनेक वस्ती आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याचा संभव आहे.