आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील यात्रा खूपच प्रसिद्ध आहे. गर्दीदेखील खूपच पहायला मिळते. पूर्वी यात्रेत जनावरे येताना पशुधन शेतकरी बैलजोड्या जोडून यात्रेत येत. त्यामुळे खरसुंडीची यात्रा आठ ते दहा दिवस टिकून राहत असे. जनावरांच्या पौषी यात्रेची सांगता खिल्लार जनावरांच्या प्रदर्शनाने होत असते.
श्री सिद्धनाथाच्या प्रसिद्ध खरसुंडी पौषी यात्रेत पंचवीस हजारांहून अधिक खिल्लार जनावरांची आवक झाली आहे. चार दिवसांत खरेदी-विक्रीचे साडेचार हजार व्यवहार झाले. सात कोटींची उलाढाल यात्रेत झाली.
माणदेश पट्ट्यातील जातिवंत खिल्लार जनावरांची खरसुंडी पौषी यात्रा महाराष्ट्रासह इतर राज्यांतही प्रसिद्ध आहे. १२ जानेवारीपासून यात्रेला सुरुवात झाली. शेतकरी व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने जनावरे आणली. यात्रेत जनावरांची आवक चार दिवस सुरू होती. व्यापारी यात्रेत लवकर आल्यामुळे खरेदी-विक्री सुरुवातीपासून होत राहिली.व्यापाऱ्यांनी जनावरांना बट्टा नसलेली जनावरे खरेदी करण्यास सुरुवात केली. जनावरांचे दर अगदी तेजीत होते.
चाळीस हजारांहून खोंडांची सुरुवात, तर लाख, सव्वालाखापर्यंत मागणी करून खरेदी झाली. शर्यतीच्या बैलांच्या किमती तर वीस ते पंचवीस लाखांपर्यंत होत्या. बैल जोड्यांच्याही खरेदीचे व्यवहार एक लाख ते अडीच लाखांपर्यंत झाले.राज्यातील पुणे, मराठवाडा, विदर्भ व आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूतून व्यापारी खरेदी व विक्रीसाठी आले होते.
व्यापाऱ्यांनी जातिवंत खिल्लारी गटातील ‘सलगरे’ या वाणास जास्त पसंती देऊन खरेदी केली. हा वाणाला शेती व शर्यतीसाठी जास्त मागणी तज्ज्ञ, व्यापाऱ्यांतून करण्यात येत होती.सध्या खिल्लार जनावरांत या वाणास मागणी आहे. त्याचबरोबर कोशा रंगाच्या जनावरालाही पसंती व मागणी होती. पशुधन शेतकऱ्यांच्या दृष्टीने जनावरांचे दर तेजीत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. दर तेजीत असतानाही यात्रेत जनावरांची खरेदी चांगली झाली. यात्रेत एक वर्षाच्या खोंडापासून शर्यतीचे बैल व पैदासीसाठी वापरण्यात येणारे वळीव बैल जास्त संख्येने आले होते.
मार्केट कमिटीच्या वतीने यात्रेकरू, जनावरांसाठी पाणी, दिवाबत्ती, पशुवैद्यकीय सुविधा व आरोग्य सुविधा चांगल्या देण्यात आल्या. यात्रा तळ मोठा असल्याने यात्रेकरूंना समस्या जाणवल्या नाहीत.