प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पाकिस्तानमधून ई-मेलद्वारे ही धमकी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कपिलच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनासुद्धा ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात BNS च्या कलम 351 (3) अंतर्गत अंबोली पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून हे धमकीचे ई-मेल आले आहेत.या ई-मेलमध्ये लिहिलंय, ‘आम्ही तुमच्या अलीकडील हालचालींवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला वाटतंय की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणं महत्त्वाचं आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट किंवा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न नाही. आम्ही तुम्हाला हा संदेश अत्यंत गांभीर्याने आणि गोपनीयतेने हाताळण्याची विनंती करतो.’ या ई-मेलच्या अखेरीस ‘बिष्णू’ असं नाव लिहिण्यात आलं आहे.
पुढील 8 तासांत उत्तर द्या अन्यथा तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी या मेलद्वारे देण्यात आली आहे. कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांच्या तक्रारींवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तर सुगंधा मिश्राच्या तक्रारीनुसार अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेमो डिसूझानेही त्याला मिळालेल्या धमकीच्या ई-मेलबद्दल अधिकाऱ्यांना सूचित केलं आहे. यांना एकाच वेळी नव्हे तर वेगवेगळ्या वेळी जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं कळतंय.