नवीन वर्षाच्या सुरुवातीला येणारा पहिला सण ‘मकर संक्रांत’. ज्यांची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत असते त्यांच्यासाठी हा सण आणखीन विशेष ठरतो. या सणानिमित्त सुगड पुजण्यापासून पुढील १५ दिवस हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू होतात. पण, सगळ्याच महिलांना उत्सुकता असते की, हळदी कुंकवाला वाण म्ह्णून कोणती वस्तू मिळणार? त्यामुळे दुसरीकडे हळदी कुंकवासाठी वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी या विचारात बऱ्याच महिला असतात.
हळदी कुंकू करंडा
प्रत्येकाच्या घरात हळदी कुंकू ठेवण्यासाठी करंडा वापरला जातो. सोनेरी, चंदेरी, प्लास्टिकचे, मण्यांचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचेसुद्धा करंडे मार्केटमध्ये उपलब्ध असतात. ही एक उपयुक्त आणि कमी खर्चीक अशी भेटवस्तू आहे.
नाणी ठेवण्यासाठी छोटी पर्स
बहुतेक महिलांच्या हॅण्डबॅगमध्ये किंवा पर्समध्ये नाणी ठेवण्यासाठी एक खास जागा असते. भाजी घेताना किंवा रिक्षाने प्रवास करताना सुटे पैसे लागतात. मग त्यासाठी मोठ्या पिशव्यांमध्ये पैसे शोधणे कठीण होऊ शकते. पण, त्यासाठी तुम्ही सुवासिनींना लहान पाउच किंवा पर्स देऊ शकता.
डबे
स्वयंपाकघरात स्त्रियांना सातत्याने डब्यांची (कंटेनरची) गरज भासते. घरात कितीही कंटेनर असले तरी पदार्थ किंवा एखादी वस्तू ठेवण्यासाठी आपण नेहमीच कंटेनर खरेदी करतो आणि ते कधीच रिकामी राहत नाहीत. आतमध्ये लहान कप्पे असलेला कंटेनर किंवा फक्त एक मोठा प्लास्टिक कंटेनरदेखील तुम्ही स्त्रियांना भेट म्हणून देऊ शकता.
रेसिपी बुक
नवनवीन पदार्थ बनवायला घरातील प्रत्येक सदस्याला आवडते. त्यामुळे रेसिपी बुक जवळपास असेल, तर आपण त्यातील नवनवीन रेसिपी वाचून, त्या बनवून पाहू शकतो. त्यामुळे वाण म्हणून रेसिपी बुक देणे महिलांसाठी खूप उपयुक्त ठरेल.
सुगंधित मेणबत्त्या
सुगंधित मेणबत्त्या कोणत्याही घरात आनंददायी वातावरण निर्माण करतात. विविध आकार आणि फ्लेवरच्या अनेक मेणबत्त्या बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे ही भेटसुद्धा खास ठरेल.
दिनदर्शिका
नवीन वर्ष सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. त्यामुळे तुम्ही निसर्गरम्य चित्रे, विविध राज्यांची छायाचित्रे असणारी दिनदर्शिकासुद्धा भेट म्हणून देऊ शकता.
त्याचबरोबर तुम्ही लिपस्टिक, टिकल्यांचे पाकीट, आरसा, मॉइश्चरायझर, हातरुमाल, नोज पिन्स चंदेरी वा सोनेरी, अंगठ्या, बांगड्या किंवा कडे, नथणीसुद्धा देऊ शकता किंवा या वस्तू ठेवण्यासाठी बाजारात प्लास्टिकचे पाऊच उपलब्ध असतात तेसुद्धा तुम्ही महिलांना वाण म्हणून देऊ शकता.
त्याचप्रमाणे तुळशीचे रोप, साडी कव्हर, घर साफ करायचे हॅण्ड डस्टर, लहान-मोठी कापडी पिशवी आदी अनेक उपयोगी वस्तू तुम्ही सुवासिनींना यंदा हळदी कुंकवासाठी नक्कीच देऊ शकता.