मंगळवेढा येथील शिवारातून ४३ हजार ७०० रुपये किंमतीच्या कडब्याची चोरी 

मंगळवेढा येथील शिवारातून ४३ हजार ७०० रुपये किंमतीचा ज्वारीचा वाळलेला कडबा २ हजार ३०० पेंढ्या चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टरसह ८ लाख ४३ हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गणपती मच्छिंद्र केरकळ व अज्ञात तीन इसम यांच्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी संजय हरी घाटूळ यांची सोलापूर रोडला मंगळवेढा शिवारात शेती आहे. यामध्ये ज्वारीचे पीक घेतले होते. 

ज्वारीच्या काढणीनंतर शेतात वाळलेला ज्वारीचा कडबा ठेवला होता. दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरील आरोपींनी सोनालिका कंपनीच्या बिगर नंबरच्या ट्रॅक्टरमध्ये ४३ हजार ७०० रुपये किंमतीचा २ हजार ३०० पेंढ्या फिर्यादीच्या संमत्तीवाचून लबाडीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरुन घेऊन जात असताना मिळून आले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास मंगळवेढा पोलिस करीत आहेत.