अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांना गुड न्यूज! पीएम किसान सन्मान निधीबाबत महत्त्वाची अपडेट

सध्या सर्वजण १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत. विशेषकरुन प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची चर्चा आहे.आता प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ही रक्कम वाढवून १२ हजार करण्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, त्याआधीच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा १९वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. या योजनेचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहारमधून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत, अशी माहिती कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा केले जातात. यापूर्वी ५ ऑक्टोबर रोजी १८वा हप्ता वाशिम येथून हस्तांतरीत करण्यास सुरुवात केली होती. देशातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो.