पक्षाशी एकनिष्ठ आणि सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकाविल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये रावेरच्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदी संधी मिळाली आहे. कोथळीच्या सरपंच ते आता केंद्रातील मंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली आहे. सासरे एकनाथ खडसे यांनी मध्यंतरी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही रक्षा या भाजपबरोबर एकनिष्ठ राहिल्या.
त्याचे फळ त्यांना आता मिळाले आहे.जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. संगणकशास्त्रातील पदवीधर आणि मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्रजी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. रावेर मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपने रक्षा खडसे यांना सलग तिसर्यांदा संधी दिली. त्यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. रक्षा खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.