कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यास वारंवार टाळाटाळ केली जात आहे.
शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी आ. डॉ. विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली.आमदार डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी केली की त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. नोव्हेंबर महिन्यात ताकारी उपसा सिंचन योजना बंद करण्याची वेळ आली होती. केवळ कृष्णा नदीतून उपसा सिंचन योजना चालवाव्यात एवढे पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही.
पाटबंधारे विभागाच्या विनंतीनुसार दोन टीएमसी पाण्याची तातडीने मागणी होती, मात्र त्याला मान्यता देण्यास टाळाटाळ केली होती. आ. डॉ. कदम म्हणाले, कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२ टीएमसी पाणी सांगलीसाठी आहे.
त्यात प्राधान्याने टेंभू, ताकारी योजनांसह खासगी उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. सांगलीला ३२ टीएमसी हक्काचे पाणी मिळणार आहे. मात्र, ते कधी द्यायचे आणि कधी अडवायचे अशी परिस्थिती आहे. मात्र, यापुढे हे चालणार नाही. ताकारी योजनेसाठी कृष्णा नदीतून दरवर्षी ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र चार आवर्तनात ४.८ टीएमसी पाणी उचलले आहे.
टेंभू योजनेसाठी दरवर्षी २२ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. प्रत्यक्षात मात्र जवळपास १२ टीएमसी पाणी उचलले आहे. ताकारी व टेंभू योजनांच्या वाट्याचे एकंदरीत १४ ते १५ टीएमसी पाणी कर्नाटक राज्यात वाहून जाते की कोयना धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ केल्यामुळे सिंचन योजनांसाठी उपलब्ध होत नाही, असेही डॉ. कदम म्हणाले.