अलीकडच्या काळात अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. नागरिकांचे आरोग्य नवनवीन आजारांमुळे धोक्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांची संख्या वाढतच आहे. सोमवारी संध्याकाळी पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली आहे. आतापर्यंत केवळ पुण्यात या आजाराचे रुग्ण आढळत होते.
परंतु, आता कोल्हापूरमध्येही दोघांना जीबीएसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीएस या आजाराचे दोन रुग्ण कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल आहेत. कोगनोळी कर्नाटक येथील ६० वर्षांचे वृद्ध आणि हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील ६ वर्षांच्या मुलावर दोन दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन प्रशासन आणि राज्य सरकारकडून सातत्याने केले जात आहे. पुण्यामध्ये आतापर्यंत १२० हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही.
प्राथमिक लक्षणांमध्ये हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्यावतीने सुरू आहे. या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जीबीएसची लक्षणे..
- हात आणि पाय सुन्न होणे
- हात आणि पायांना मुंग्या येणे
- स्नायूंची कमजोरी
- चेहरा, डोळे, छाती आणि हातपाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू
- छातीचे स्नायू अर्धांगवायू झाल्यामुळे श्वास घेण्यात समस्या