हुपरी परिसरात यळगूड, जंगमवाडी, रांगोळी आदी गावांत आवळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यळगूडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन तसेच ग्रामदैवत हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पदयात्रा निघाली. हातकणंगले मतदारसंघात आमदार राजू आवळे यांनी पाच वर्षांत २५५ कोटींचा भरघोस निधी देऊन विकासकामांचा डोंगर उभारला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे राजू आवळे लाखो बहिणींसाठी लाडके भाऊ आहेत.
यंदाच्या निवडणुकीत त्यांना १३ गावांतून गतवेळपेक्षा दुप्पट मताधिक्य देऊ, असा विश्वास रेंदाळच्या सरपंच सुप्रिया भरत पाटील यांनी व्यक्त केला. रेंदाळ येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत त्या बोलत होत्या. सरपंच पाटील म्हणाल्या, रेंदाळसाठी आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी विकासासाठी निधी दिला नाही. मात्र, आवळे यांनी कोट्यवधींचा निधी दिला. दिलेला शब्द पाळणारा आवळेंसारखा आमदार आतापर्यंत बघितला नाही. त्यामुळे यावेळी त्यांचे मताधिक्य दुप्पट होणार आहे.
आमदार राजू आवळे म्हणाले, मतदारसंघात काम करताना कधीही गट-तट, पक्ष न पाहता सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले. संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष असताना हजारो गोरगरीब जनतेला पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला. पाच वर्षांत केलेल्या २५५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या जोरावर हुपरी परिसरातील गावांतून मताधिक्य मिळवून सहज निवडून येणार आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, उपसरपंच अभिषेक पाटील, तालुकाध्यक्ष भगवान जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी घोडेस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनाजी करवते, ज्येष्ठ नेते महिपती पाटील, ग्रामपंचायत सदस्या दया पाटील, उषा चौगुले, अन्नपूर्णा गळतगे, देवकी विभूते, मुकुंद पतंगे, रणजित खोत, सतीश कुंभार, बाबासाहेब शिंदे, गोरख शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
