यल्लम्मा चौकात धारदार शस्त्राने अट्टल गुंडाने फोटोग्राफरला भोसकले

सध्या गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र सर्वच भागात दिसत आहे. खून, मारामारी, अवैध्य धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. अशीच एक ह्दय पिळवटून टाकणारी घटना इस्लामपूर येथे घडली आहे. एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या किरकोळ कारणावरून येथे यल्लम्मा चौकात तिघांनी मिळून एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. २७) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडली आहे. गौरव हेमंत कुलकर्णी (वय २०, रा. गणेश भाजी मंडई, इस्लामपूर) असे मृत युवकाचे नाव आहे.

याप्रकरणी अट्टल गुंड व यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सौरभ सुशील पाटील (रा. इस्लामपूर), जहांगीर मुजावर (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) या दोघांसह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर पोलिसांनी काल रात्रीच या दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा हल्लेखोर फरार आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, गौरव कुलकर्णी याने सौरभ पाटील यांच्याकडे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रागाने बघितल्याचे निमित्त झाले.

यात रागाच्या भरात सौरभ याने त्याच्या अन्य दोन सहकाऱ्यांना घेऊन गौरव कुलकर्णी याचा चाकूने भोसकून खून केला. सोमवारी रात्री उशिरा येथील यल्लमा चौकात ही घटना घडली. गौरव हा व्यवसायाने फोटोग्राफर होता. तर, संशयित सौरभ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. घटनेचे वृत्त समजतात पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी आपली यंत्रणा तात्काळ सक्रिय करत या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. सौरभ पाटील हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचे अन्य दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर होता. दरम्यान, त्याने हा आणखी एक कारनामा केला आहे.