सध्या प्रत्येक बाबतीत महागाई वाढतच चाललेली आहे. अलीकडेच एसटीदरात वाढ केल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र एसटी महामंडळाने अचानक एसटी भाडेवाडीमध्ये पंधरा टक्केची वाढ करून सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. या विरोधात आज शहापूर एसटी डेपो येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश व शिवसेनाप्रमुख सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. यावेळी सयाजी चव्हाण म्हणाले कि, एसटी भाडे वाढ करून सर्वसामान्य जनतेवर एक प्रकारचा अन्याय केलेला आहे.
राज्यातील सरकारचे परिवहन मंत्री यावर बोलताना म्हणतात की, भाडेवाढ कधी झाली मलाच माहिती नाही असे वक्तव्य करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचा आरोप शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांनी महाराष्ट्र शासनाचा या भाडेवाडी विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.