रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी त्यांच्या उद्योगात चांगलेच यशस्वी होतात. मुकेश अंबानी यांनी कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक मार्केटमध्ये मोठा डाव खेळला होता. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंज्यूमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) या व्यवसायात 50 वर्ष जुनी असलेल्या कँपा कोलाला विकत घेऊन रिलॉन्चिंग केले. त्यानंतर जिओप्रमाणे प्राइज वॉर सुरु केला. त्यात कोका-कोला आणि पेप्सीसारख्या कंपन्यांना चांगले आव्हान देत 18 महिन्यांत 1,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवला.
मुकेश अंबानी यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. ते ज्या व्यवसायात उतरतात त्या ठिकाणी प्राइज वॉर सुरु करतात. त्यानंतर त्या उद्योगात किंग बनतात. जिओच्या लॉन्चिंग दरम्यान मुकेश अंबानी यांनी ही खेळी केली होती. त्यामुळे जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इतर कंपन्यांना किंमत कमी करावी लागली होती. आता कोल्ड्र ड्रिंक मार्केटमध्ये असाच प्रकार होत आहे.
1970 आणि 1980 च्या दशकातील कँपा कोला ब्रँडला रिलायन्सने विकत घेतला. 2022 मध्ये या ब्रँडचे अधिग्रहण केल्यानंतर मार्च 2023 मध्ये रिलॉन्च केले. कंपनीने 200 मिलीलीटरच्या पेट बोटलची किंमत मात्र ₹10 ठेवली. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत ही किंमत जवळपास आर्धी होती. कंपनीची ही मूल्य निर्धारण रणनीती बाजारात यशस्वी ठरली.
रिलायन्सने आपल्या नेटवर्कमध्ये रिलायन्स फ्रॅश, स्मार्ट स्टोर्स आणि जिओमार्टचा उपयोग करुन कँपा कोला देशभरातील बाजारात पोहचवला. तसेच विक्रेत्यांना 6-8% मार्जिन दिले. ते इतर जागतिक ब्रँडच्या तुलनेत अधिक होते. त्यामुळे विक्रेत्यांनीही कँपा कोलाची विक्री सुरु केल्याने हा ब्रँड अधिक मजबूत झाला. कँप कोलाचा प्रभाव वाढत असल्यामुळे कोका-कोला आणि पेप्सीकोला आपली किंमत कमी करावी लागली. तसेच त्यांनीही नवीन पॅकेजिंगसोबत प्रॉडक्ट बाजारात आणला. कँपा कोलाची आक्रमक रणनीती आणि मूल्य निर्धारणामुळे कोका-कोला आणि पेप्सीकोला बाजारात तगडा स्पर्धक तयार झाला.
रिलायन्स कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेडने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आता 500 ते 700 कोटींची गुंतवणूक योजना सुरु केली आहे. ही गुंतवणूक उत्पादन क्षमता वाढवणे आणि स्थानिक बाजारपेठेत उत्पादन सुलभ उपलब्ध करुन देण्यासाठी केली जाणार आहे. एकंदरीत मुकेश अंबानी यांची 10 रुपयांच्या किंमतीच्या रणनीतीने भारतीय कोल्ड्रींक बाजारात नवीन आध्याय लिहिला गेला आहे.