भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल आंतरराज्य घरफोड्याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. अस्लम मेहबुब सनदी (वय ३३, अथणी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे.त्याच्याकडून चार दिवसांपूर्वी शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी उघडकीस आणली आणि सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने असा ४ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरासह परिसरातील वाढत्या घरफोड्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या विविध पथकांद्वारे सुरू आहे. अंमलदार महेश खोत यांना एक अट्टल गुन्हेगार शहापूर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी टोप (ता. हातकणंगले) येथे एका हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सापळा रचून अस्लम सनदीला ताब्यात घेतले. त्याने शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकानगर भागातील दिवसा केलेल्या घरफोडीची कबुली दिली.त्याच्याकडून ५९.५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ४ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सनदी कर्नाटक आणि महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक शेष मोरे, आतिष म्हेत्रे, अंमलदार महेश खोत, सतीश जंगम, संजय कुंभार, महेश पाटील, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, सुहास पाटील, सचिन बेंडखळे आदींच्या पथकाने केली.