फसवणुकीच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात खूप दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. यामध्ये अनेक नागरिकांची आर्थिक फसणूक देखील होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सध्या असाच फसवणुकीचा प्रकार इचलकरंजीत उघडकीस आलेला आहे. कर्ज मंजुरीचे अमिष दाखवून पेट्रोल पंप मालकाची २५.४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष माणिकचंद मालु (वय ५४, व्यवसाय – पेट्रोल पंप मालक, रा. कागवाडे मळा, इचलकरंजी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अश्विनी महेश ओझा (रा. वानरसे हॉस्पिटल, इचलकरंजी) हिने हाऊसिंग लोन मंजूर करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी कागदपत्रे घेतली आणि त्यांच्या तसेच त्यांच्या मुलाच्या बँक खात्यावरून एकूण २५,४०,०००/- रुपये आर.टी.जी.एस.द्वारे घेतले.
मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतरही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे फिर्यादींनी आरोपीकडे आपल्या पैशांची मागणी केली असता, आरोपीने सारस्वत बँकेचा १२,५०,०००/- रुपयांचा चेक दिला, परंतु खात्यात पुरेशा रकमेचा शिल्लक नसल्याने तो चेक वटला नाही. याबाबत विचारणा केली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेवटी आपल्या फसवणुकीची जाणीव झाल्यावर फिर्यादींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासानुसार, आरोपीने विश्वास संपादन करून मोठ्या रकमेची फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.याबाबत शिवाजीनगर पोलीस ठात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक प्रसन्ना कांबळे करत आहेत.