आचारसंहिता लागू झाल्यानंतर महावितरण कंपनीने राज्यातील सुमारे २.७५ कोटींहून अधिक वीज ग्राहकांना आचारसंहिता भंग करणारी वीजबिले वितरित करण्यास सुरूवात केली आहे. या बिलांवर दोन्ही बाजूला राज्य सरकारची ‘सुराज्य – एक वर्ष सुराज्याचे’ अशा मथळ्याखाली पंतप्रधान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेली जाहिरात छापली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि महावितरण कंपनीविरोधात आचारसंहिता भंगाची कारवाई करावी, अशी तक्रार समाजवादी पार्टी, महाराष्ट्रच्यावतीने भारत निर्वाचन आयोग, नवी दिल्ली यांच्या पोर्टलवर आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे, या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुराज्याच्या एका वर्षातील समृद्ध महाराष्ट्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ही जाहिरात हा उघडउघड आचारसंहिता भंगाचा प्रकार आहे. याबाबत २३ मार्चला तक्रार दाखल झाल्यावर २४ मार्चला आयोगामार्फत महावितरण कार्यालय, कोल्हापूर यांना अशा बिलांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.