पंचांना लाथ घालून हुज्जत घालणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर तीन वर्षे कुस्ती खेळण्याची बंदी घालण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील स्पर्धेत पंचांशी गैरवर्तवणूक केल्याचा ठपका राक्षेवर ठेवण्यात आला आहे. यानंतर आता शिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. शिवराजचे निलंबन केले तसे पंचांना सुद्धा शिक्षा करा, अशी मागणी शिवराजच्या आईने केली आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅच फिक्सिंग होते, असा गंभीर आरोपही शिवराजच्या वहिनीने केला आहे. दरम्यान, अहिल्यानगरमध्ये झालेल्या 67व्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापुरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. एका गुणाने महेंद्रचा पराभव करत पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
त्यानंतर पृथ्वीराजने त्याच्या वडिलांना खांद्यावर उचलून घेत आपला आनंद व्यक्त केला. मात्र, शिवराज राक्षेकडून झालेल्या वर्तनाने स्पर्धेला गालबोट लागले. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर कुस्ती परिषदेकडून कारवाई करण्यात आली आहे.
दोघांनाही तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे. शिवराजनं पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडलं आहे.
रामदास तडस म्हणाले की, पंचांनी दिलेला निर्णय बरोबर होता. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळायला हवं. पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणं हे एका खेळाडूला शोभत नाही, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. शिवराज राक्षेला या स्पर्धेतून तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला कुठेही खेळता येणार नाही. महेंद्र गायकवाडने कुस्ती खेळत असताना हाफ टाईममध्ये पंचांसोबत वाद घातला, शिवीगाळ केली. आमच्या कार्याध्यक्षांवर सुद्धा अरेरावीची भाषा वापरली. हे एका खेळाडूला न शोभणारं आहे, त्यामुळे दोघांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे रामदात तडस म्हणाले.