QR Code Election:निवडणूक कर्मचाऱ्याची एका क्लिकवर मिळणार माहिती, राज्यभर लागू होणार ‘क्यूआर कोड’

निवडणुकीसाठी सेवेत घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची एक क्लिकवर माहिती मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेशावर क्युआर कोडचा वापर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या प्रयोगाची राज्य शासन व निवडणूक आयोगाने दखल घेतली संपूर्ण राज्यात याचा वापर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीसाठी ३५ हजारांवर कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या आदेशाच्या प्रतवर क्युआर कोडचा वापर करण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्या लोकसभा व विधानसभा मतदारसंघात नियुक्ती देण्यात आली आहे.

याची माहिती एक क्‍लिकवर प्रशासनाला कळणार आहे. क्युआर कोडचा वापर केल्यामुळे मास्टर डेटाबेसमधून हजेरीपटानुसार उपस्थित, अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी, पोस्टल बॅलेटसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी ही अवघ्या काही मिनिटातच तयार होणार आहे.

या सर्व याद्या बनविण्यासाठी जवळपास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो आणि बऱ्याच मनुष्यबळाचा वापर होतो. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आदेशात क्युआर कोड दिल्यामुळे या सर्व याद्या काही तासातच तयार होणार आहेत.