गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. याआधीच्या बिग बॉसने सुरज चव्हाणचं नशीब बदलून टाकलं. त्याचा आता नवा चित्रपट येतोय. असे असतानाच यावेळच्या बिग बॉसमध्येही असाच नवा चेहरा येणार का? असे विचारले जात होते. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आता बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.
आता फेब्रुवारी महिन्यातच बिग बॉस मराठीचे नवे पर्व चालू होणार आहे. कलर्स मराठीने याबाबत अधिकृतपणे घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळीही बिग बॉस मराठीच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख याच्यावरच सोपवण्यात आली आहे. याआधीच्या पर्वातही रितेशने सर्व स्पर्धकांना वेळ पडेल तेव्हा चांगलेच खडसावले होते. रितेशने आधीचे पर्व चांगलेच गाजवले होते. त्यानंतर आता यावेळीही रितेश देशमुख आपल्या अनोख्या शैलीने स्पर्धकांची शाळा घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दररोज दुपारी तीन वाजता बिग बॉस मराठीचा नवा भाग कलर्स मराठीवर प्रक्षेपित केला जाईल. विशेष म्हणजे आधीच्या पर्वाप्रमाणे यावेळी बिग बॉस मराठी जिओ सिनेमावर कधीही पाहता येणार आहे.
बिग बॉसच्या नव्या पर्वाची घोषणा झाल्यानंतर आता यावेळी कोण-कोण स्पर्धक असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण याआधीच्या पर्वात वर्षा उसगांवकर, सूरच चव्हाण, पॅडी कांबळे यासारखे प्रसिद्ध चेहरे होते. या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात धम्माल उडवून दिली होती. वेळोवेळी या स्पर्धकांत भांडणेही पाहायला मिळाली होती. त्यामुळे यावेळी बिग बॉसच्या घरात कोण असणार? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी बिग बॉसमध्ये अनेक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर, सिने क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे सहभागी होण्याची शक्यता आहे.