आटपाडी तालुक्यातील शेटफळेत वीज उपकेंद्र कधी होणार सुरू? शेतकऱ्यांनी दिला बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा

आटपाडी तालुक्यात टेंभू योजनेचे पाणी आल्याने विजेच्या मागणीत चौपट वाढ झाली आहे. त्याचा करगणी उपकेंद्रावर अतिरिक्त भार पडल्याने शेटफळे, हिवतड परिसराला सध्या शेतीला केवळ चार तास वीज पुरवठा सुरू आहे. त्यात २० वेळा पुरवठा खंडित झाला.विजेची समस्या सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी सात कोटींचे पाच मेगावॉट क्षमतेचे उपकेंद्र मंजूर करून आणले ते पूर्ण केले.

मात्र दहा महिन्यांपासून वन विभागाच्या कागदोपत्री खेळामुळे अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे ओढे, विहिरींना मुबलक पाणी असूनही पिकांना देता येत नाही. आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील वीज उपकेंद्र उभारणीला दहा महिने उलटले, तरीही वन विभागाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे कार्यान्वित झालेले नाही. त्यामुळे वीज नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणे अवघड झाले आहे. केवळ चार तास शेतीला वीज मिळत आहे.

शेटफळे उपकेंद्राला सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथून वीजपुरवठा जोडला जाणार आहे. त्याचे काम पूर्ण आहे. मात्र वनीकरणात जेमतेम सहाशे फूट लांबीचे तीन विद्युत खांब उभारण्याचे काम रखडले आहे. या ठिकाणी झाडे नसतानाही वन विभागाने हे खांब उभारण्यास परवानगी नाकारली आहे.आमदार सुहास बाबर यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. येथील ‘महावितरण’ उपविभागीय कार्यालयाने वन विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. त्याला वन विभागाने दरवेळी केराची टोपली दाखवली आहे.

अधिवेशनातील लक्षवेधीनंतर वन विभागाने ‘महावितरण’कडे आधीची दिलेली माहिती, पुन्हा नव्याने विहित नमुन्यात मागवून घेतली.तीही तत्काळ पाठवली. मात्र पुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे सात कोटी रुपये खर्चून उभारलेले उपकेंद्र धूळ खात पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणसमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.