देहू नगरीतून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (H.B.P. Shirish Maharaj More) यांनी आज (5 फेब्रुवारी) सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.प्राथमिक अंदाजानुसार, आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देहू गावावर आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठच्या सुमारास शिरीष महाराज मोरे (Shirish Maharaj More) यांनी आपल्या राहत्या घरी उपरण्याच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. ते नवीन बांधलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत होते, तर आई-वडील खालच्या मजल्यावर राहत होते. आज सकाळी बराच वेळ होऊनही ते खाली न आल्याने कुटुंबीयांनी वर जाऊन दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला.
त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांनी पंख्याच्या हुकाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.
विशेष म्हणजे, येत्या 20 फेब्रुवारी रोजी शिरीष महाराज मोरे यांचा विवाह होणार होता. नुकताच त्यांचा साखरपुडा (टिळा) देखील झाला होता. लग्नाच्या अवघ्या काही दिवस आधी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे दिसत आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत. दरम्यान, ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिरीष महाराज मोरे यांचे निगडी येथे इडलीचे उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. या घटनेने मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.