मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे पशुपालकांनी मुक्त गोठयात ठेवलेल्या ७५ हजार रुपये किंमतीच्या ३ जर्शी गायी चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी विवेक विठ्ठल चौगुले यांची मल्लेवाडी येथे दाते पेट्रोल पंपाशेजारी शेती असून या शेतात गायीसाठी मुक्त गोठा बांधला आहे.
त्यामध्ये चार जर्शी गायी व एक रेडी अशी जनावरे असल्याने ते वैरण टाकून गावात दररोज रहावयास जातात. दि.२ रोजी रात्री ८ वाजता गायींना चार टाकून फिर्यादी घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७वाजता फिर्यादी हे जनावरांना चारा टाकण्यासाठी शेतात मुक्त गोठ्याजवळ आले असता;चार जर्शी गायीपैकी एकच जर्शी गाय फिर्यादीस दिसली.
त्यामुळे गायी सुटून बाहेर गेल्या असाव्यात असा त्यांनी कयास करुन सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्या मिळून न आल्याने फिर्यादीची खात्री झाली की, ७५ हजार रुपये किंमतीची ३ जर्शी गायी संमतीशिवाय अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या आहेत असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.