बलवडी फाट्याजवळ भीषण अपघात, कारच्या धडकेत महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. खानापूर तालुक्यातील बलवडी भा. येथील सांगली-सातारा जुन्या रस्त्यावरील बलवडी फाट्यानजीक कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील प्रितंका अनंत पोटे (वय ३२, देवराष्ट्रे, ता.कडेगाव) या महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलवडी फाट्यावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिस महिलेचा दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रितंका पोटे या तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे येथून त्या तुरची येथे पोलिस प्रशिक्षण केंद्राकडे दुचाकी (एमएच १० डीएच ९९०६) वरून निघाल्या होत्या. बलवडी फाटा येथे आल्यानंतर दुचाकीची धडक होऊन अपघात झाला.

सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रितंका यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून प्रितंका यांचा बलवडी फाट्यावर अपघात झाल्याचे कळविले. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बलवडी फाट्याकडे धाव घेतली. त्यावेळी बलवडी फाट्यावर प्रितंका यांची दुचाकी आणि कार (एमएच १० इके ०६१४ ) यांचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, पोटे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी होऊन त्या जागीच ठार झाल्या.

तर पोटे यांच्या दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, विटा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तर प्रितंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

दरम्यान, अपघातातील कारचालक उदय रामचंद्र पवार (वय ३६, रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) याने भरधाव वेगात, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, हयगयीने, निष्काळजीपणे वाहन चालवून प्रितंका पोटे यांच्या दुचाकीला समोरुन जोरात धडक देऊन तिच्या मृत्यूस व दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.