पुन्हा कोरोनाचे संकट! भारतात कोव्हीडचा नवा व्हॅरीयंट, यंत्रणा अलर्ट

कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट भारतात मिळाला आहे. तसेच कोव्हीडमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. कोरोनाचा सबव्हॅरीयंट JN.1 ची पहिली केस केरळमध्ये मिळाली आहे. या दोन घटनांनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. आरोग्य यंत्रणाकडून मॉक ड्रिल करण्यात आले. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश राज्यांना दिले. यासोबतच केरळची सीमा बंद केली जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

सिंगापूरमधून भारतात कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट आला आहे. सिंगापूरवरुन भारतात आलेल्या एका प्रवाशामध्येही JN.1 हा कोरोना व्हॅरीयंटचा उपप्रकार आढळून आला होता. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी आहे. 25 ऑक्टोबर रोजी तो सिंगापूरला गेला होता. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी या व्हॅरीयंटचा दुसरा रुग्ण आढळला नाही. परंतु हा वेगाने पसरणारा व्हॅरीयंट आहे. भारतात अजून JN.1 प्रकाराचे दुसरी कोणतीही केस नोंदवली नाही.

केरळमध्ये एकाचा मृत्यू

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता या घटनेनंतर, परिसरात कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याचे काम सुरु केले आहे. आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अब्दुल्ला असे मृताचे नाव असून तो 80 वर्षांचा होता. खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

केरळमधील घटनेनंतर कोव्हीड प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यांना ताप आहे त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याची सूचना दिली गेली आहे. तसेच जे कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत, त्यांना क्वारंटाईन करण्याचे म्हटले आहे. मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आले आहेत.