गेल्या दोन वर्षांपासून देशात करोनानं माघार घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होत असून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. मात्र, आता पुन्हा एकदा करोना डोकं वर काढतो की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. याला कारण ठरला केरळमध्ये सापडलेला करोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटचा रुग्ण. चीनमध्ये या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले असून आता भारतातही केरळमध्ये या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून आता केरळमुळे कर्नाटकमधील आरोग्य यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आता कर्नाटकमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात आली आहे.
केरळमध्ये जेएल १ व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सोमवारी कर्नाटकमधी उपाययोजनांची माहिती दिली. मंगळवारी यासंदर्भात कर्नाटक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कसक्ती करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच, या बैठकीत जेएन १ व्हेरिएंट नेमका किती धोकादायक आहे? त्याचा किती प्रभाव पडू शकतो? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे? अशा मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या व्हेरिएंटचा रुग्ण केरळमध्ये आढळला असून कर्नाटकमध्येही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती राव यांनी दिली. मात्र, यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “आत्ता सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसाठी मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. पण जर करोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तर आपल्याला अशा नियमावली लागू करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
मात्र, सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये”, असं राव म्हणाले.“मी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये यासंदर्भात चर्चा केली आहे. यासंदर्भातील समितीने ज्येष्ठ नागरिक व हृदयाशि निगडित आजार असणाऱ्या व्यक्तींना मास्कसक्ती करण्याची शिफारस केली आहे”, अशी माहिती राव यांनी दिली. “कर्नाटक-केरळ सीमेवर या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. कुणालाही ताप, सर्दी किंवा खोकला असल्यास त्याची करोना चाचणी केली जाईल.
राज्यातील रुग्णालयांना चाचण्यांची संख्या वाढवण्याबरोबरच अतिरिक्त बेड, ऑक्सिजन सिलेंडर, पीपीई किट्स व इतर आवश्यक सामग्रीसंदर्भात तयारी करण्याचेही निर्देश दिले आहेत”, असंही राव म्हणाले.