ऊसदराची बैठक निष्फळ; राजू शेट्टींनी दिला आंदोलनाचा इशारा

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तिसरी बैठकही काल निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्‍यास 3250, साडेबारा उतार्‍याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील, असा अंतिम प्रस्ताव दिला.

मात्र दोन तासानंतरही ठोस तोडगा न निघत नसल्याने माजीखासदार राजू शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी बैठक झाली. या बैठकीला विश्वास कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक, क्रांतीचे शरद लाड, वसंतदादाचे विशाल पाटील, राजारामबापूचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी संघटनेने केली होती, परंतु जिल्ह्यातील कारखानदार 3100 रुपये पहिली उचल देण्यावर ठाम होते. मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली. त्यामुळे या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला.