आता मिळणार 600 रुपयांत LPG सिलेंडर! तुम्हालाही मिळू शकतो ‘या’ योजनेचा लाभ

दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने  (Inflation) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session of Parliament) महत्त्वाची माहिती देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंघ पुरी (Union Minister Hardeep Singh Puri) एलपीजी बाबत (LPG Gas Cylinder) सांगितलेल्या आकडेवारीनं नक्कीच अनेकांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेत नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी जाणून घेऊयात सविस्तर… 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितलं की, गरीब कुटुंबांना स्वस्त दरांत एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) उपलब्ध करून देण्यात सरकार इतर देशांच्या तुलनेत प्रभावी ठरलं आहे. शेजारील देश पाकिस्तान (Pakistan), नेपाळ (Nepal) आणि श्रीलंका (Sri Lanka) येथे एलपीजीच्या किमती (LPG Prices) भारतापेक्षा खूप जास्त आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना एलपीजीच्या वापराबाबतही माहिती दिली.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) एलपीजीचा सरासरी दरडोई वापर एप्रिल-ऑक्टोबरमध्ये 3.8 सिलेंडर रिफिल झाला आहे, जो 2019-20 या वर्षात 3.01 सिलेंडर रिफिल होता. आणि या काळात आर्थिक वर्ष 2022-23 ते 3.71 होतं. केंद्रीय मंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटुंबांना 300 रुपये अनुदान देतं. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्लीत 603 रुपयांना 14.2 किलोंचा एलपीजी सिलेंडर मिळेल. जर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ती नवी दिल्लीत 903 रुपयांना खरेदी करावी लागेल. नंतर, 300 रुपयांची सबसिडी थेट तुमच्या खात्यावर पाठवली जाईल. हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, पाकिस्तानमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1059.46 रुपये आहे, श्रीलंकेत 1,032.35 रुपये आणि नेपाळमध्ये 1,198.56 रुपये आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, 2014 मध्ये 14 कोटी एलपीजी ग्राहक होते, मात्र आता ते 33 कोटी झाले आहे. त्यांनी सांगितलं की, एकट्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी ग्राहक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या किमतींत एलपीजी गॅसचा लाभ मिळावा, हाच यामागे मूळ हेतू होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 75 लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली आहे. 75 लाख नव्या कनेक्शनसह, पीएम उज्ज्वला योजनेतील एकूण लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी होईल.

जर तुम्हाला पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आता तुम्हाला ‘Apply for PMUY कनेक्शन’वर क्लिक करावं लागेल. ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्हाला घ्यायचा आहे, ती कंपनी निवडा. यानंतर, कागदपत्रांसह सर्व माहिती भरा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काही दिवसांत या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.