नागपूर शहरात अवैध दारु विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुखाच्या हॉटेलवर धाड टाकण्यात आली आहे. या ठिकाणी अवैध दारुसाठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख मंगेश काशीकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
नागपुरातील बजाजनगर येथील ‘अपना ढाबा एनएच 1’ या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत अवैध दारुचा साठा जप्त केला. ही कारवाई परिमंडळ एकच्या उपायुक्तांच्या पथकाने केली. संबंधित हॉटेल शिवसेना शिंदे गटाचे नागपूर शहर प्रमुख मंगेश काशीकर यांचे असल्याचं समोर आलं आहे.
ही धडक कारवाई केल्यानंतर पोलिसांनी हॉटेलला तातडीने कुलूप लावलं. पोलिसांनी हॉटेलचे संचालक मंगेश काशीकर आणि भरत दुबे या दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान मद्य बेकायदेशीररीत्या साठवण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून या अवैध दारु रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूर शहरात अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी पोलिसांच्या कारवाया सुरुच राहतील, असे स्पष्ट संकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
