उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर बायोपिक, हा अभिनेता साकारणार भूमिका

गेल्याकाही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे.आतापर्यंत अनेक चित्रपट लोकप्रिय खेळाडूंवर, कलाकारांवर, राजकारणी नेत्यांच्या आयुष्यावर बायोपिक आले आहेत. आता देशातले लोकप्रिय वकील अशी ओळख असलेले उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)यांच्या आयुष्यावर सिनेमा येणार असल्याचं नक्की झालं आहे.

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यासह देशातील अनेक गाजलेल्या खटल्यांत विशेष सरकारी वकील म्हणून कर्तव्य बजावलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यातच आता त्यांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव दिसणार असल्याचं नक्की झाल्याच समोर आलंय. या बोयिपक चित्रपटात १९९३ चा मुंबई ब्लास्ट आणि २००८ चा मुंबई ट्रेन बॉम्ब स्फोट या दोन महत्त्वाच्या घटनांचा समावेश असणार आहे.

दिनेश विजान या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत , तर अविनाश अरुण दिग्दर्शन करणार आहेत. राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ या चित्रपटानं जगभरात ८७४.५८ कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि तो २०२६ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी आधी आमिर खानचं नाव समोर येत होतं. मात्र, आता निर्मात्यांनी राजकुमार राव याच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.’विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ’, ‘भूल चूक माफ’, ‘मालिक’ आणि सौरव गांगुली यांच्या बायोपिकनंतर आता त्याच्या झोळीत उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकदेखील पडला आहे.