सध्या अनेक भागांमध्ये गुन्हेगारी, भ्रष्टाचार वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याला सर्वसामान्य जनता देखील कंटाळली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर झालेल्या लोकायुक्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खानापूरचे तहसीलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना निलंबित केले आहे. लोकायुक्त छाप्यात त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.तहसीलदार गायकवाड यांनी बेकायदेशीर मालमत्ता जमविल्याचा आरोप करत दोघा माहिती हक्क कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली होती. याबाबत लोकायुक्तांकडेही तक्रार करण्यात आली होती.
त्यानुसार लोकायुक्त पोलिसांनी बेळगाव चौथ्या अतिरिक्त विशेष जिल्हा सत्र न्यायालयातून शोध वॉरंट घेऊन 8 जानेवारी रोजी तहसीलदारांशी संबंधित बेळगाव, खानापूर, निपाणीतील सहा ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी तहसीलदार गायकवाड यांच्याकडे उपलब्ध मालमत्तांच्या स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे चौकशीत आढळून आले. कर्नाटक लोकायुक्त विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकांनी याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला.
खानापूर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या बेबंदशाहीला सामान्य जनता कंटाळली आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षकांसह भूमापन आणि भूमी अभिलेख विभागातील तीन अधिकार्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यानंतर खुद्द तहसीलदारांवर निलंबनाची नामुष्की ओढविल्याने अधिकार्यांचे धाबे दणाणलेत.