मलप्रभेत बुडून मण्णूरच्या युवकाचा मृत्यू……

सध्या अनेक भागात यात्रा उत्सव सुरु आहेत. त्यामुळे भागाभागात अलोट गर्दी सुरु आहे. आईसोबत परडी भरण्याच्या धार्मिक कार्यक्रमासाठी नदी तीरावर आलेल्या तरुणाचा अंघोळ करताना मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी (दि. 26) दुपारी दीडच्या सुमारास शहरातील नदी घाटाजवळ ही घटना घडली. समर्थ मल्लाप्पा चौगुले (वय 22, रा. मण्णूर ता. जि. बेळगाव) असे तरुणाचे नाव आहे. तो पदवीच्या दुसर्‍या वर्षात शिकत होता. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मण्णूरमधील लोक यल्लम्मादेवीच्या परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी नदी घाटावर आले होते.

पूजेची तयारी सुरु असताना समर्थ आंघोळीसाठी नदीपात्रात उतरला. नव्या नदी घाटावरील पायर्‍यांवर आंघोळ करताना त्याला पाण्याच्या खोलीचा त्याला अंदाज आला नाही. पाय घसरुन तो पाण्यात बुडाला. आंघोळ करणार्‍या काही तरुणांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो हाती सापडला नाही. याबाबत खानापूर पोलिस व अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली. बोटीद्वारे शोधकार्य सुरु करण्यात आले. अडीच तासानंतरही त्याचा शोध लागला नाही.

अखेरीस बेळगावमधील एचईआरएफ रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. टीम प्रमुख बसवराज हिरेमठ यांनी अत्याधुनिक वॉटरप्रूफ कॅमेर्‍यांच्या साहाय्याने नदीपात्रात शोध सुरु केला. काही वेळातच समर्थचा मृतदेह नदीच्या तळाशी आढळून आला. मृतदेह बाहेर काढून सरकारी दवाखान्यात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.