सोलापूरबरोबरच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याची होणार सोय

जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार उजनी धरणातून आज सोमवारी सकाळी नऊ वाजता सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. सोलापूरबरोबरच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद व नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण 100 टक्के भरले होते. पावसाचा जोर सुरूच असल्यामुळे जवळपास 100 टीएमसीपेक्षा जास्त पाणी पावसाळ्यात नदीपात्रातून सोडून देण्यात आले.

उजनी धरण 100 टक्के भरल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूर शहरासह इतर तीन नगरपरिषदा व नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. शनिवारी (दि. 15) कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर बोगद्याच्या माध्यमातून सीना नदीमध्ये सोडण्यात येणारे पाणीही शनिवारी बंद करण्यात आले आहे.

कालवा व बोगद्यातून सुरू असलेले पाणी बंद करून आता भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. भीमा नदीत सोडलेले पाणी सोलापूरच्या औज बंधार्‍यात पोहोचेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यावेळी नदीकाठचा वीजपुरवठा कमी करण्यात येणार आहे. जेणेकरुन पाणी वेळेत सोलापूरजवळील औज बंधार्‍यात पोचणे सोपे जाणार आहे.

उजनी धरणातून भीमा नदीत सोमवारी सकाळी नऊ वाजता 1600 क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. त्या पाण्यामध्ये टप्याटप्याने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे भीमा नदी काठच्या सर्व नागरीकांनी नदीपात्रात उतरु नये. नदीमधील शेती पंप, नदी काठची शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हटविण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.