सोलापूर जिल्ह्यात सौम्य भूकंप; सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याची माहित

सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता २.६ अशी होती. सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी हे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील सांगोला हे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने एक्स या सोशल माध्यमावर प्रसिद्ध केली. हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झाला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे.

१९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला आहे. सांगोला तालुक्याच्या शेजारी असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातही हा भूकंप जाणवल्याचे सांगितले जात आहे. सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले. सांगोला तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून स्फोट झाल्यासारखे मोठे आवाज येतात. त्याचबरोबर बुधवारी (दि. २) दोनवेळा मोठे आवाज आले होते. हे आवाज कशाचे आहेत हे कोणीही सांगू शकत नाही.

गुरुवारी सकाळी ही ११ वाजून २२ मिनिटांच्या दरम्यान असाच आवाज झाला. यामुळे हा भूकंप आहे, असे कोणीही सांगत नाही. नागरिकांना विचारले असता काही तसे जाणवले नाही असे सांगतात; पण नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भूकंपाबाबत सांगोला तालुक्यात सर्वत्र चर्चा होती. भूकंपाची तीव्रता जरी जास्त असली तरी तो झाल्याचे ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण मागील एक-दोन दिवसांपूर्वी भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंप झाला होता. त्यामध्ये अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले होते; पण सोलापूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र, नागरिक भूकंप झाल्याचे ऐकून घाबरले आहेत.