सर्वसामान्यांना मोठा दिलासा! डाळींच्या दरात मोठी घट…..

गेल्या काही महिन्यांपासून महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. तूर डाळीबरोबरच हरभरा आणि उडीद डाळीच्या दरांतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक असलेल्या डाळींच्या किमती सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामात तूर डाळीचे उत्पादन वाढल्याने आणि आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दर घसरले आहेत.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत तूर डाळीच्या दरात किलोमागे तब्बल 50 ते 60 रुपयांची मोठी घट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजेच जून-जुलै महिन्यात तूर डाळीचा दर १७५ रुपये प्रतिकिलो इतका गगनाला भिडला होता. मात्र, आता हा दर प्रतवारीनुसार 107 ते 130 रुपये प्रतिकिलो दरम्यान स्थिरावला आहे.कर्नाटक, मराठवाडा, विदर्भ आणि गुजरातमध्ये तूर डाळीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे.

कर्नाटकात तूर डाळीचा हंगाम सुरू झाल्याने मार्केट यार्डातील भुसार बाजारात मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होत आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने दर कमी झाले आहेत.फक्त तूर डाळीच नाही, तर हरभरा आणि उडीद डाळीच्या दरांतही घट झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


    हरभरा डाळीच्या दरात 15 ते 20 रुपयांनी घट
    उडीद डाळीच्या दरात 5 ते 7 रुपयांनी घट

व्यापाऱ्यांच्या मते, सध्या मार्केट यार्डात रोज 80 ते 100 टन तूर डाळीची आवक होत आहे. पुढील काही आठवड्यांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे डाळीच्या दरांत अजूनही घट होण्याची शक्यता आहे.डाळीच्या घसरलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. जे ग्राहक महागाईमुळे डाळी खरेदी करण्यास मर्यादा घालत होते, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. पुढील काही दिवसांत दर आणखी घसरू शकतात.