मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?

 राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने या आजारानं चांगलंच डोकं वर काढलं असून पुण्यासह राज्यभरात जीबीएस रुग्णांची संख्या 210हून अधिक झाली आहे. (GBS) अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले असले तरी GBS मुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 9 वर पोहोचलीय. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी या आजाराचा वाढता प्रसार वेगाने होतोय.

हा आजार गर्दीने आणि संसर्गाने होत असल्याची शंका येत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची बैठक घेऊन लवकरात लवकर राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असं केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी सांगितलं.बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.. केंद्रीय आरोग्य विभाग आणि यंत्रणा या आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही जाधव यांनी सांगितले. त्यामुळे आता जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. बुलढाण्यात सैलानीबाबांची मोठी यात्रा असते. देशाच्या कानाकोपऱ्यात या यात्रेसाठी अनेक भाविक येतात.

करोना काळात देशातील यात्रा, महोत्सवांवर निर्बंध होते. आता जीबीएसचा धोका वाढत असताना देशभरात जीबीएसचे रुग्ण सापडतायत.त्यामुळे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जीबीएसमुळे यात्रांवर निर्बंध येण्याची शक्यता बोलून दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तत्परतेने काम करत आहोत.केंद्र शासन तसेच राज्याचे आरोग्य खातेही जीबीएसवर मात करण्यासाठी तयार असून पूर्ण व्यवस्था केली आहे.

गर्दीमुळे जीबीएसचा संसर्ग होत असेल,तर संबंधित डॉक्टरांसह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यात्रांवरील निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असेही जाधव यांनी स्पष्ट केले. शिंदे गट भाजपात विलिन होईल, या खासदार राऊत यांच्या भाकिताची खिल्लीही त्यांनी उडवली.संजय राऊतांनी ठाकरे गट सांभाळावा असेही ते म्हणाले.